Friday, September 8, 2017

पाउस दाटलेला माझ्या घरावरी हा...

पाउस दाटलेला माझ्या घरावरी हा...

उन्हाळ्यात करपून निघालेल्या जमीनीसमान पाखरेसुद्धा पावसाची आतूरतेने वाट पाहतात. पावसाच्या आगमनाने सर्व स्रुष्टी सुखद होते, आनंद पावते. आसमंतात एक नव चैतन्याची भरारी दिसून येते.

सुगरण पक्षी आपल्या दिनचर्येत बदल आणतात. उदरनिर्वाहाची चिंता मागे टाकत आता आपल्या कुशल कारागिरीने घर बांधण्यात पारंगत होतात. झाडाची निवड, कॉलनीत घराची नेमकी जागा, घर बांधायचे सामान, कोवळे गवत, नारळ आणि ताडाच्या झाडाची कोवळी पालवी, एक ना अनेक, केवढे काम. दिवस रात्र एकच ध्यास, माझे घर सर्वात खास. शेवटी काय तर कुटूंबाचा प्रश्न आहे राव. निर्माणकरत्याने लावून दिलेल्या नियमानुसार पुढील पिढीची तयारी ही तर फारच मोठी जवाबदारी.

इथे आपल्याला पसंत पडलेल्या सुगरणीशी जमवायचा प्रश्न नाही, पण आपण बांधलेले घर एखाद्या सुगरणीने पसंत करणे सगळ्यात महत्वाचे. नाहीतर एवढ्या मोठ्या मेहनतीवर पाणी, (अन् तेही नेमके पावसाचे). सर्व कॉलनीत गजबजाट, नवरदेवांचे काम पहायला येणार्यांची गर्दी, घर पसंतीस न उतरल्याने पुन्हा नवीन जोमाने तयारी. आमच्या गण्याने देखील पुन्हा, अर्धवट बांधून झालेल्या घरावर नवीन मजला बांधायची केली घाई. कशी वेळ निघून चालली होती, गण्यासाठी कोणीतरी थांबेल काय, त्याने उशीरा बांधून झालेल घर कुणी पसंत करेल काय? बरेच दिवस निघून गेले. इकडे या झाडाचा रूबाब वाढला होता. संपूर्ण परीसरात त्याला सुगरण कॉलनीचा मान या वर्षी प्राप्त झाला होता. वाऱ्यावर ऐटीत डोलत, दिमाखात घरट्यांना मंदपणे झोके देत उभा होता. त्या झाडालादेखील एकाप्रकारे नवचैतन्य लाभले होते.

सर्व कॉलनी संसार थाटून तयार, घरातील सजावटीचे काम नव दांम्पत्याने जोमात चालू केले. घराला घरपण आले, त्यातील उबदारपणा वाढला. सूगरण बाईंनी एके दिवशी पहाटे आपल्या अहोंना खुशखबर देत घरट्यात दोन अंडी टाकली. आता चिमुकल्यांच्या आगमनाची ओढ बहूतांश घरट्यात सर्वांनाच लागून राहिली.

अशीच सकाळची वेळ, बाहेर एवढा गोंधळ कसला म्हणून संपूर्ण कॉलनी आपआपल्या दारात जमा झाली. पाहतात तर काय, आपल्या गण्याच्या घराचा पाया गाठीतून निसटला, संपूर्ण घर फक्त एका धाग्यावर, अधांतरी डोलत. वाऱ्याच्या आणी अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या तडाख्यांत वेडेवाकडे हालत, सर्व जणांच्या थट्टेचा विषय बनून राहिले. पण गण्याला त्याची शुद्धच नव्हती, त्याच्या पायाखालची जमीन हलून निघाली होती. वाटले होते जिच्यासाठी एवढी केली मेहनत, तिनेतरी पाठीशी उभे राहून आलेल्या संकटावर मात करण्याची द्यावी हिम्मत. पण सर्वांमध्ये झालेल्या हास्यामुळे ती गण्याला त्याच्या धाग्यावर (नशीबावर) सोडून दूर निघून गेली.☺

बिचारा गण्या, घरटे सुटले अन स्वप्न तुटले...

गिरीश चोणकर, वसई